परीक्षा केंद्राबाहेरच तरुणीची छेडछाड

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दहावीच्या परीक्षेसाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या टवाळखोरांनी क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. छेडछाडीचा जाब विचारल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थिनी परीक्षा केंद्रात शिरताच दबा धरून बसलेल्या गुंडांनी तिच्या भावावर फायटरने जीवघेणा हल्ला केला. 
या घटनेमुळे वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली. या गंभीर प्रकारानंतर वैजापूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी परीक्षेसाठी बाहेरगावावरून खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर येत होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून काही स्थानिक टवाळखोर तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते. हा प्रकार विद्यार्थिनीने आपल्या भावाला सांगितला. सकाळी १० वाजेच्या सुमारास जेव्हा भाऊ आपल्या बहिणीला पेपरसाठी सोडायला आला, तेव्हा त्याने या टवाळखोरांना जाब विचारला. त्यानंतर बहीण परीक्षेसाठी वर्गात गेल्यानंतर काही वेळातच तिथे उपस्थित असलेल्या टवाळखोरांनी भावाला घेरले. काही समजण्याच्या आतच त्यांनी खिशातील फायटर काढून तरुणाच्या डोक्यावर आणि तोंडावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या संपूर्ण प्रकारानंतर तातडीने धाव घेत मध्यस्थी केल्याने तरुणाचा जीव वाचला, त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत.